तवा पुलाव - Tava Pulav
साहित्य:
:::: भातासाठी ::::
१ टिस्पून + १ टिस्पून बटर
३/४ कप बासमती तांदूळ
दिड ते पाउणेदोन कप पाणी
मिठ
:::: मसाला ::::
गाजर : १/८ कप पातळ चिरलेले (१ इंच तुकडे)
भोपळी मिरची: १/४ कप पातळ उभी चिरलेली (१ इंच तुकडे)
फ्लॉवरचे तुरे अर्धे शिजवलेले : १/४ कप
कांदा : १/४ कप बारीक चिरून १/८ कप उभा चिरलेला.
टॉमेटो : १/२ कप बारीक चिरून
शिजवलेला बटाटा : १/८ कप बारीक फोडी
वाफवलेले मटार : १/४ कप
दिड टिस्पून लसूण पेस्ट
१/२ टिस्पून जिरे
दिड टिस्पून लाल तिखट
२ टिस्पून बटर
१ टिस्पून पावभाजी मसाला
खडा मसाला : १ लहान तुकडा दालचिनी, २ लवंगा, १ तमाल पत्र, १ वेलची
सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर
कृती:
१) बासमती तांदूळ धुवून १० मिनीटे निथळत ठेवावा. नंतर १ टिस्पून बटर नॉनस्टिक भांड्यात गरम करावे त्यावर बासमती तांदूळ २ ते ३ मिनीटे परतावा. नंतर दिड ते पाउणेदोन कप पाणी घालावे. थोडे मिठ घालावे. मिडीयम लो फ्लेमवरती झाकण न ठेवता भात शिजवावा. मधेमधे ढवळावा. भात शिजला कि एका ताटात किंवा परातीत तो मोकळा करावा. थोडे बटर शिजलेल्या भाताला लावून घ्यावे. वरून बटर घातल्याने भाताला छान तकाकी येते. हे करताना भाताची शिते मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी.
२) नंतर नॉनस्टिक तवा मध्यम आचेवर गरम करावा. त्यात २ टिस्पून बटर घालावे. लगेच जिरे घालावे. जिरे तडतडले कि लसूण पेस्ट आणि लाल तिखट घालावे. ३० सेकंद परतावे.
३) कांदा घालून थोडे परतावे. कांदा थोडा शिजला कि भोपळी मिरची आणि गाजर घालावे. साधारण २ ते ३ मिनीटे परतावे. भाज्या अगदी पूर्ण शिजवू नयेत.
४) नंतर फ्लॉवरचे तुरे, टॉमेटो घालून १-२ मिनीटे परतावे. नंतर मटार, बटाटा आणि पावभाजी मसाला घालावा. चवीनुसार मिठ घालावे. पावभाजीला करतो तशा या भाज्या आपण मॅश करणार नाही आहोत कारण पुलावमध्ये भाज्या दिसल्या पाहिजेत.
५) हि भाजी तयार झाली कि ती तव्याच्या एका कडेला करून घ्यावी. तव्याच्या रिकाम्या भागात १/२ टिस्पून बटर घालावे त्यात खडामसाला घालावा. १० - १५ सेकंद परतून भाजी त्यात मिक्स करावी. जर आपण खडा मसाला आधीच फोडणीत घातला असता तर त्याचा स्वाद गरजेपेक्षा जास्त उतरला असता. म्हणून भाजी झाल्यावर शेवटी खडा मसाल्याची फोडणी करून भाजीत मिक्स करावी.
६) भाजी झाली कि गॅस मिडीयम हायवर ठेवावा. या भाजीत तयार भात घालावा. भाताचे ४ भाग करून एकेक भाग भाजीत घालावा म्हणजे सर्व भाताला भाजी लागेल आणि निट मिक्स होईल. तव्यावर हा भात छान परतून रायत्याबरोबर गरम गरम सर्व्ह करावा.
veg
NICE
उत्तर द्याहटवा