तांदळाची भाकरी
साहित्य:
तांदळाचं पीठ १ १/२ कप,
पाणी ३/४ कप,
अर्धा चमचा मीठ,
कृती:
दोन प्रकारे भाकरी करता येते. एक तर पिठात पाणी मिसळून नाहीतर उकड काढून. पहिली पद्धत अशी.
प्रथम पाणी थोडे गरम करावे. पीठ ताजे असेल तर थंड पाणी चालते. जुन्या पिठाला गरम पाणी लागेल.
एका परातीत किंवा उथळ भांड्यात पीठ घेऊन त्यात पाणी आणि मीठ घालून चांगले मळावे. मऊसर गोळा तयार होईल.
भाकरीसाठी तवा मध्यम आंचेवर तापत ठेवावा. एकदा तापला की आंच कमी करावी.
एकीकडे पिठाचे २ इंच व्यासाचे गोळे करावेत व एका ओल्या फडक्याखाली किंवा टिश्यूपेपरखाली झाकून ठेवावेत.
एका मोठया ताटात थोडे तांदळाचे पीठ पसरवावे. एक गोळा चांगला मळून त्यावर ठेवावा. आणि वरुन थोडे पीठ भुरभुरावे. एका हाताने हा गोळा गोल गोल ३० अंशात घड्याळाच्या काट्य़ाच्या दिशेने फिरवत थापत जावा. वरून लागेल तसे अजून पीठ घ्यावे.
भाकरी व्यवस्थित सर्वबाजूंनी पातळ थापली गेली की दोन हातानी अलगद उचलून तव्यावर वरची पिठाची बाजू वरच राहील अशी टाकावी.
लगेचच हाताने वरच्या बाजूवर सगळीकडे पाणी पसरवावे. पाणी सुकल्यासारखे वाटले की (म्हणजे जेमतेम १० सेकंदात) ताबडतोब भाकरी उलटावी.
मग अजून १० सेकंद तव्यावर ठेवून भाकरी एका हातात कालथा व दुसर्य़ा हातात फुलक्यांचा चिमटा घेऊन उचलावी व मोठ्या आंचेवर प्रथम पाणी लावलेला भाग येईल अशी धरावी.
भाकरी छान फुगली पाहिजे. आता मध्येच उलटून दुसरीही बाजू शेकून घ्यावी. अश्या प्रकारे दोन्ही बाजूंना काळे डाग पडेस्तोवर भाजून घ्यावी.
उकड काढून भाकरी अशी करावी:
प्रथम एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे.
उकळी आली की त्यात मीठ घालून लगेचच पीठ एकाहाताने थोडेथोडे घालत ढवळत रहावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. गॆस बंद करावा.
ही झाली उकड तयार. ही उकड गरम असतानाच चांगली मळून घ्यावी. पोळ्यांच्या कणकेइतपत मऊसर झाली पाहिजे.
उकडीचे २ इंच व्यासाचे गोळे करुन एका ओल्या फडक्याखाली किंवा टिश्यूपेपरखाली झाकून ठेवावेत. भाकरी शक्यतो लगेचच करायला घ्यावी.
एकीकडे तवा तापत ठेवावा. आंच मंद असावी.
पोळपाटावर एक गोळा घेऊन पोळीसारखा तांदळाच्या पिठावर लाटावा.
लाटलेली भाकरी अलगद दोन्ही हातानी उचलून पिठाची म्हणजे वरची बाजू वरच येईल अशा पद्धतीने तव्यावर टाकावी.
पुढील भाजायची पद्धत वरीलप्रमाणेच.
गरम भाकरी, वर ताजं लोणी (उपलब्ध असल्यास) नाहीतर तूप, आणि जोडीला खर्डा, लसणीचं तिखट + तेल, किंवा ठेचा, पिठलं, भरली वांगी, मेथीची गोळा भाजी, अंबाडीची भाजी, आलू पालक यापैकी काहीही किंवा अगदी चिकन सुद्धा मस्त लागतं.
veg
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा