दहीवडे - Dahi Vada
साहित्य:
१/२ कप उडदाची डाळ
१/४ कप मुगाची डाळ
मीठ चवीप्रमाणे
दह्याचे १ १/२ कप पात्तळ ताक
१ १/२ कप घट्ट दही
साखर २ ते ३ टीस्पून
मीठ १/२ ते ३/४ टीस्पून
१/२ टीस्पून आले पेस्ट/ किसलेले आले
१ टेबलस्पून धने-जिरे पूड
१ टीस्पून लाल तिखट
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
चिंचेची गोड चटणी (आवडीप्रमाणे)
कृती:
१. उडदाची डाळ आणि मुगाची डाळ ४-५ तास पाण्यात भिजत घाला. भिजलेल्या डाळी एकत्र करून पाणी न घालता बारीक वाटून घ्या. मीठ घालून ढवळून घ्या. मिश्रणात गरज वाटली तर अगदी किंचित (१ ते २ चमचे) पाणी घाला.
२. एकीकडे दह्याचे पात्तळ ताक करून घ्या.
३. घट्ट दही घोटून घ्या. त्यात मीठ साखर आणि आल्याची पेस्ट घाला. अगदी थोडेसे पाणी घालून थोडेसे पात्तळ करून घ्या. दही फ्रीज मध्ये ठेवून द्या.
४. कढईत तेल गरम करा. एका पातेल्यात गार पाणी घालून ठेवा.मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन रंगावर मध्यम आकाराचे वडे तळून घ्या वड्यांचा आकार खूप मोठा ठेवू नका.
५. तळलेले वडे लगेचच गार पाण्यात घाला. ३-४ च्या बॅच मध्ये वडे तळून घ्या. दुसरी बॅच तळून होईपर्यंत आधीचे वडे पाण्यातच ठेवा.पाण्यात भिजल्यावर वड्याचा रंग फिक्कट होईल आणि वडे थोडेसे फुगून आकार मोठा होईल.वडे पाण्यातून काढताना किंचित पिळून पाणी काढून टाका आणि मग हे वडे ताकात भिजत घाला.
६. साधारण तास-दोन तास वडे ताकात भिजत फ्रीज मध्ये ठेवा.
७. सर्व्ह करताना, बाऊलमध्ये ताकातले वडे ठेवा. वरती घोटून ठेवलेले दही घाला. त्यावर धने-जिरेपूड, लाल तिखट चिमटीने घाला. आवडत असल्यास चिंचेची गोड चटणी घाला.कोथिंबीर घालून थंडगार दहीवडे सर्व्ह करा.
sweet dish
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा